मराठी ब्लॉग विश्व

Tuesday, October 15, 2013

काही लोक कितीही टायर्ड झालेत तरी रिटायर होत नाहीत.

काही लोक कितीही टायर्ड झालेत तरी रिटायर होत नाहीत. कवींबद्दल बोलायचं तर
पाडगावकरांचं उदाहरण देता येईल. माझ्या माहितीनुसार त्यांनी लेखन थांबवल्याची घोषणा मागेच केली होती. पण त्यानंतरही त्यांच्या कविता प्रकाशित होत राहिल्या.
यंदा तर त्यांनी मुलांसाठी रामायण की महाभारत लिहल्याची बातमी होती. दिवाळी अंकातही त्यांच्या कविता दरवर्षीप्रमाणे सर्वत्र अग्रक्रमाने दिसतीलच. अर्थात त्या दिसतंच राहो अशाच माझ्या शुभेच्छा आहेत. अर्थात हे त्यांच्या प्रतिभेचं सामर्थ्यचं आहे. आणि संपादकांचं कौशल्य. फॉलअपचं. आणि आपलं भाग्य...विंदांनी मात्र शेवटी शेवटी म्हणजे वयाच्या ८० जवळ असताना वगैरे आपलं कवितालेखन थांबवलं होतं, अशी माझी ऐकीव माहिती आहे. ही गोष्ट एक आदर्श गोष्टच म्हटली पाहिजे. अर्थात असा आदर्श घडवण्यासाठी इतकं दीर्घायुष्य लाभणं ही काही साधी गोष्ट नाही. पण कविता लिहत राहिल्याने कविशिवाय इतरांचं फारसं बिघडत नसावं. पण आताच्या काळात एवढा लांब शेवट वाट्यावर येण्याची शक्यता फारच थोडी वाटते. त्यामुळे माझ्यासह अनेकजण आजीवन लिहितच राहतील, असे वाटते...अर्थात रिटायर न होण्यातून कोणाचीही सुटका होणे कठीणच..!!!

Saturday, June 25, 2011

मुके केले ओठ...

ओट्यावर चाळीत मी पुस्तकाची पाने
मला तसे तुला सुचू लागले बहाणे
घासायला भांडी आली तुही अंगणात
एकदाच फुटे हसू दोघांच्या गालात
कधी भेटायचे माझे बोलायचे डोळे
आज नको उद्या भेटू तुझे ठरलेले

दुपारच्यावेळी तुझं चालायचं धुणं
धाब्यावर मीही उभा उन्हाला झेलून
पाहून तू मला जेव्हा हसायची सखे
ऊन मला वाटायचे पावसासारखे
कधी भेटायचे माझे हलायचे ओठ
उद्या उद्या वार्‍यावर लिहायची बोटं

असावीस चुलीपुढे भाकरी थापत
वाटायचे खिडकितल्या धुराला पाहत
कशी माझी मुकी हाक कळायची तुला
दारामधे यायचीस मला बघायला
खांद्यानं तू पुसायची कपाळाचा घाम
आज नको उद्या भेटू उद्या नाही काम

खोल खोल निजेमधे बुडालेलं खेडं
तुझ्या माझ्या देहावर चंद्राचा उजेड
चेहर्‍याभोवती तुझ्या लपेटले हात
मुके केले ओठ उद्या म्हणायच्या आत....

- वैभव देशमुख

Wednesday, March 16, 2011

किती दिवस...

किती दिवस धरून ठेवशील केसांमधे काळा रंग
किती दिवस लखाकेल तुझं गोरं गोरं अंग

किती दिवस डोळ्याखालची काळी वर्तुळं टळतील
किती दिवस गाली तुझ्या लाल फुलं फुलतील

किती दिवस राहील तुझ्या देहामधे दरवळ
किती दिवस खेचशील वासनांची वर्दळ

किती दिवस काळजाचा आवाज तुला येणार नाही
किती दिवस जीव तुझा आरशाला भिणार नाही

...वय तुझ्या अंगावर दाट जाळं विणेलच
मी खोटं बोलत नव्हतो हे तुला कळेलच....

- वैभव देशमुख

Tuesday, March 15, 2011

दिसे दिसायास

दिसे दिसायास वार साधा
नसे परी हा प्रकार साधा

अजून आहे घरंगळत मी
नको म्हणू हा उतार साधा

किती अशी कंजुषी असावी
दिला न मज तू नकार साधा

फसून जातो सहज कुठेही
खरेच मी फार फार साधा

तिथे बुडाले पुरात डोळे
इथे दिसेना तुषार साधा

धरा फिरवतात हात त्याचे
म्हणायला कामगार साधा

जगापुढे या असेल काही
तुझ्यापुढे मी सुमार साधा

कधी मला माग तू हवे जे
कळेल... नाही उदार साधा

किती निरागस दिवस जुने ते
सरळ रहाणी विचार साधा

बरेचदा श्वास टाळतो मी
नकोस समजू चुकार साधा

जिवास मी लावतो पणाला
मला न जमतो जुगार साधा

- वैभव देशमुख

Monday, January 10, 2011

नाव तुझ्या ओठावर...

नाव तुझ्या ओठावर माझे
धरती माझी अंबर माझे

स्पर्शामधला प्रश्न तुझा अन
मौनामधले उत्तर माझे

रात्र तुझ्या स्मरणात काढतो
स्मरण तुझे झाले घर माझे

अखेर तुज कळली सुंदरता
बघितलेस तू अंतर माझे

मला बिलगला गंध तुझा अन
तुला लागले अत्तर माझे

हा सारा माझाच उन्हाळा
हे सारे गुलमोहर माझे

- वैभव देशमुख

Sunday, September 19, 2010

उन्हाळी दुपार...

उन्हाळी दुपार सुस्तावले रान
मुके पानपान जाहलेले


आंब्याच्या पानात पाखरे गुडुप
मेंढ्यांचा कळप आंब्याखाली


बाभूळ झाडाची फाटकी सावली
तेथे विसावली गुरे काही


सुक्या नदिकाठी नग्न उभे साग
आकाशात आग लागलेली


कुणी एक बाई सरपन शोधात
लेकरु पोटात वाढताना...


- वैभव देशमुख

Wednesday, September 8, 2010